dr babasaheb ambedkar information |- डॉ बाबासाहेब आंबेडकर
पूर्वार्ध (जन्म, शिक्षण व विवाह)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही केवळ व्यक्ती नसून तो एक विचार आहे. त्यांचे जीवन आणि कार्य हे तळागाळातील हजारो वर्षांच्या सामाजिक अन्याय आणि आर्थिक शोषणामुळे भरडलेल्या लोकांकरिता प्रेरणा आहे. ही प्रेरणा केवळ वैचारिक पातळीपुरती मर्यादित नाही तर झोपलेल्या समाजाला जागृत करून त्यांच्यात स्वाभिमान, अस्मिता आणि आर्थिक सबळता निर्माण करण्याचा कृति कार्यक्रम आहे. जाज्वल्य राष्ट्रनिष्ठा आणि देशप्रेम काय असतं हे ज्यांना जाणून घ्यायचं असेल त्यांनी डॉ. बाबासाहेबांचं चरित्र वाचायला हवं !
डॉ. बाबासाहेब म्हणजे महाराष्ट्राच्या मातीने विश्वाला आणि या देशाला दिलेले एक अनमोल रत्न होय. डॉ. बाबासाहेबांची एक विशेष नोंद इतिहासाला घ्यावी लागेल ती यासाठी की, हे रत्न एका अस्पृश्य आणि हीन समजल्या जाणाऱ्या 'महार' जातीत जन्माला आलं आणि विश्वव्यापी झालं.
रत्नागिरी जिल्ह्यातील 'आंबडवे' या गावी डॉ. आंबेडकरांचे पूर्वज राहात. 'आंबडवे' हे गाव रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड या तालुक्याच्या ठिकाणापासून १७ कि. मी. अंतरावर आहे. त्यांचे मूळ आडनाव 'सकपाळ' असे होते. त्यांचे आजोबा मालोजी सकपाळ हे लष्करात नोकरीला होते. पुढे त्यांचा वारसा त्यांचा मुलगा रामजी सकपाळ यांनी चालविला. शिवाजी महाराजांच्या काळानंतर आलेल्या ब्रिटिशांनी लष्करामध्ये 'mahar regiment' केली. याच महार रेजिमेंटमध्ये सुरुवातीला शिपाई, नंतर चौदा वर्षे लष्करी छावणीत शिक्षक व नंतर बढतीने सुभेदार मेजर म्हणून कार्यरत होते. पुण्याच्या पंतोजी शाळेत शिकलेल्या रामजींना मराठी भाषेबरोबरच इंग्रजी व काही प्रमाणात संस्कृत भाषाही येत होती. त्यामुळे अनेक धार्मिक ग्रंथांचेही त्यांचे वाचन झालेले होते. त्यांचे घराणे नाथपंथी असून घरचे वातावरण अत्यंत धार्मिक होते. भजन, कीर्तन, नामस्मरण सातत्याने त्यांच्या घरी चालत असे. बुद्ध व कबीर यांच्या विचारांचे पाईक असलेले रामजी शुद्ध शाकाहारी होते.
परिस्थितीने गरीब परंतु सुसंस्कृत असलेल्या सुभेदार रामजी यांचा विवाह मेजर धर्माजी मुरबाडकर या श्रीमंत व्यक्तीची कन्या भीमाबाई यांच्याशी झाला.
जन्म व बालपण
सुभेदार रामजी आणि भीमाबाई यांच्या पोटी दि. १४ एप्रिल १८९१ रोजी 'महू' नावाच्या लष्करी छावणीत भीमरावांचा जन्म झाला. भीमाबाईंच्या पोटी जन्म घेणारे भीमराव हे चौदावे अपत्य होय. आईच्या नावामुळे च त्यांच नाव 'भीम' असे ठेवण्यात आले. भीमाला आवडीने सर्व जण 'भीवा' म्हणत हाच 'भीवा' पुढे कर्तृत्ववान भीमराव झाला.
भीमराव लहानपणी अत्यंत खोडकर, दंगेखोर होते. त्यांना अभ्यासाची फारशी आवड नव्हती परंतु रामजींना मात्र आपल्या मुलाने खूप शिकावे असे वाटत असे. भीमराव साधारणतः तीन वर्षाचे असताना 'महू' येथून त्यांचे वडील सेवानिवृत्त झाले. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथून दोन ते तीन तासांच्या अंतरावर व इंदौर येथून २० कि. मी. च्या अंतरावर महू हे गाव आहे. सेवानिवृत्तीनंतर काही दिवसांनी रामजींनी आपले कुटुंब काप-दापोलीला हलविले.
शिक्षणाची सुरुवात
लष्करातील बऱ्याच मंडळींची मुले दापोलीच्या शाळेत होती. त्यामुळे रामजींनी भीम व मोठा मुलगा आनंद या दोघांनाही दापोलीच्या शाळेत घातले. सेवानिवृत्तीमुळे रामजींचे मासिक उत्पन्न पन्नास रुपये एवढेच होते. एवढ्या अल्प उत्पन्नात कुटुंबाचा चरितार्थ भागत नसल्याने त्यांनी आपले कुटुंब दापोलीहून साताऱ्यास हलविले. सातारा येथे शासनाच्या बांधकाम विभागात त्यांना नोकरी मिळाली. नोव्हेंबर १९०० मध्ये सातारा येथील सरकारी माध्यमिक (सध्याचे प्रतापसिंह हायस्कूल) शाळेत भीमराव आणि त्यांचे भाऊ आनंद यांचे नाव दाखल करण्यात आले. आजही ७ नोव्हेंबर हा दिवस डॉ. भीमराव आंबेडकरांचा 'शाळा प्रवेशदिन' म्हणून साजरा होतो. कारण आजही शाळेत भीमरावांचे नाव नोंदवलेले रजिस्टर आणि त्यांची स्वाक्षरी पाहावयास मिळते.
त्या काळी बदल्यांच्या ठिकाणी मूळ गावावरुन आडनावे पडत असत. त्यामुळे रामजीचे आडनाव 'सकपाळ' वरुन 'आंबवडेकर' हे पडले होते. त्यामुळेच शाळेतही भीमरावांचे नाव शाळेत 'आंबवडेकर' असेच लावण्यात आले.
अस्पृश्यतेची वागणूक
![]() |
father of constitution |
'अस्पृश्यता' हा समाजाला लागलेला रोग आहे. अस्पृश्यता केवळ भारतातच नाही तर आशियातील अनेक देशांत वेगवेगळ्या नावाने आढळते. जपानमध्ये अस्पृश्यांना 'ईटा' म्हणतात, कोरियात 'नेइक चोंग' म्हटले जाते, यमनमध्ये 'आखदाम', नायजेरियात 'ओस्' केनिया, इथियोपिया आणि 'टान्झानियातील 'वात्ता' यांचाही समावेश वरील वर्गात होतो. मात्र भारत, पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ, भूतान आणि अफगाणिस्तानात जे अस्पृश्य आहेत त्यांच्याशी पूर्वी क्लेशदायक व्यवहार झाला आहे.
भारत देशापुरता विचार केला असता त्या काळी भारत सामाजिकदृष्ट्या अतिशय भयंकर अवस्थेत होता. जातिभेदाच्या विषवल्लीने सर्व समाजाला विळखा घातलेला होता. तशात इंग्रजांचा तो काळ त्यांनी तत्कालीन सामाजिकतेत परिवर्तनाचा दृष्टिकोन मुळीच ठेवलेला नव्हता. भारतीय तत्कालीन समाजात जाति- पातीच्या भिंती घट्ट होत्या. अस्पृश्यता मोठ्या प्रमाणावर होती. अस्पृश्यांना 'जीवन' सुद्धा नाकारले जात असलेल्या काळात छोट्या भीमरावांना खालच्या जातीत जन्माला आल्यामुळे अस्पृश्यतेचे अनेक चटके बसत गेले.
शाळेत विटाळ होईल म्हणून इतर मुलांपासून त्यांना दूर बसावे लागत असे. विद्यार्थी तर विद्यार्थी परंतु शिक्षकसुद्धा वह्या, पुस्तके दुरूनच टाकत असत. एकदा तर एक शिक्षक भीमरावांना म्हणाले, "अरे, तू महाराच पोर, शिकून काय करणार आहेस? तू शाळा सोडून घरी गेलेलं ई.स.१९०४ चा प्रसंग भीमराव इंग्रजी चौथी परीक्षा उत्तीर्ण झाले. जातीने महार असल्याने संस्कृत भाषेची आवड असतानाही शिक्षकाच्या संकुचित वृत्तीमुळे त्यांना पर्शियन भाषेकडे वळावे लागले. पुढे मात्र स्वप्रयत्नांनी ते संस्कृत शिकले. आणखी एक शाळकरी प्रसंग असा की, एके दिवशी वर्गात शिक्षकाच्या सांगण्यावरून गणित सोडविण्यासाठी भीमराव फळ्याकडे चालले होते. तोच वर्गात मुलांचा अचानक कल्लोळ सुरू झाला कारण सर्व मुलांचे खाण्याचे डबे फळ्याच्या आड ठेवलेले होते. त्या डब्यांना शिवाशिव होऊन त्यातील अन्न भ्रष्ट होईल म्हणून ओरडत ओरडत ती मुले फळ्याकडे धावत सुटली.
लहानपणी एकदा आपल्या आईबरोबर भीमराव एका कापड दुकानात गेले. तेथे तो व्यापारी विटाळ होईल म्हणून यांच्या आईच्या दिशेने कापड भिरकावत होता व इतर ग्राहकांना मात्र हातात देत असे.
एकदा तर फार विचित्र प्रकार त्यांच्यासोबत घडला तो असा, खूप तहान लागली म्हणून भीमरावांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या पाणवठ्याचे पाणी स्वतः हाताने पिलं. तेव्हा महाराच्या पोरानं पाणवठा बाटवला म्हणून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली.
असाच एक प्रसंग- रामजी नोकरीनिमित्त गोरेगाव येथे राहात होते. त्यांच्याकडे सुटीच्या दिवशी जाण्यासाठी भीमराव आपला भाऊ व भाचा यांना घेऊन मसूर स्टेशनपर्यंत रेल्वेने गेले. स्टेशन मास्तरला यांची जात समजली असता त्यांनी यांच्याशी असाच दुर्व्यवहार केला आणि मसूरपासून गोरेगाव बैलगाडीने | जात असता जात समजल्यावर त्यांना बैलगाडीतून उतरविण्यात आले. अशा अनेक प्रसंगानी भीमराव व्यथित झाले व त्यांच्या बालमनावर याचा फार खोलवर परिणाम झाला.
आणि 'बय' सोडून गेली
![]() |
| Mata Bhimai ramji sakpal |
भीमराव आपल्या आईला 'बय' म्हणत असत. बाहेरच्या सर्व यातना सहन करूनही थोड्याशा सुखावलेला या परिवारावर अचानकपणे काळाने झडप घातली इ.स. १८९६ चा तो प्रसंग भीमाला शाळेत जाऊन काही दिवस होतात तोच रामजींची बदली साताऱ्याच्या खटाव तालुक्यातील दुष्काळी भागात झाली. याच काळात दुर्दैवाने भीमाची आई 'भीमाबाई' आजारी पडली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे भीमाची आई परलोकी निघून गेली. अस्पृश्यता व गरिबीच्या झळया सोसणारी ही मुलं आता आपल्या आईविना पोरकी झाली. भीम त्या वेळी अवघ्या सहा वर्षांचा होता. कदाचित भीमाचा उज्ज्वल भविष्यकाळ पाहणे आईच्या नशिबी नसेल?
भीमाबाईच्या मृत्यूनंतर भीम व त्यांचा भाऊ आनंद यांचा सांभाळ त्यांची आत्या मीराबाईंनी केला. मीराबाईंचा घरात दरारा होता. रामजी आपल्या मुलांची खूप काळजी घेत. भीमाने खूप शिकावे, मोठे व्हावे असे त्यांना नेहमी वाटे. मुलांना शिस्त लावण्यासाठी ते नेहमी प्रयत्नरत असायचे. सकाळी उठून मुलानी भजन, अभंग म्हणावेत, रात्री भोजनाच्या वेळी सर्वांनी उपस्थित राहावे, असा त्यांचा नियम होता...
मुले लहान असल्याने रामजींनी दुसरे लग्न केले. एकदा त्या सावत्र आईने भीमाच्या आईचे दागिने घातले. त्यामुळे भीम, त्याचा भाऊ आनंद व आत्या मीरा या सर्वांना रडू कोसळले. आईच्या आठवणीने मुले रडत असलेले पाहून रामजी त्यांच्यावर रागावले. वडिलांच्या रागावण्यामुळे तो त्यांच्यापासून दूर-दूर राहु लागला.
आंबेडकर आडनावाचे रहस्य
भीमा दुसरी इंग्रजी वर्गात शिकत होता. भीमा स्वभावाने तापट, जिद्दी व हट्टी होता. सातत्याने मिळणाऱ्या अस्पृश्यतेच्या वागणुकीमुळे तो कमालीचा अस्वस्थ झाला होता. हा सर्व प्रकार बारकाईने पाहणारे आंबेडकर आडनावाचे एक संवेदनशील गुरुजी भीमाच्याच शाळेत माध्यमिक विभागास शिकवीत असत. ते भीमावर खुप प्रेम करीत असत. जातीने स्वतः ते ब्राह्मण होते. त्यांच्या हृदयात ब्रह्म जाणणाऱ्या खऱ्या ब्राह्मणाचे दर्शन घडते.
ज्या ब्राह्मण जातीकडून अस्पृश्यतेचे सर्वाधिक चटके बसत. त्याच जातीतील अनेक ब्राह्मण कुटुंबे बाबासाहेबांची चाहती होती, अभिमानी होती, ही आंबेडकर गुरुजींचीच पुण्याई होती. भीमानेही कधीच ब्राह्मण जातीचा द्वेष केला नाही. जो केला ब्राह्मण्याचा व्यवहारात नि समाजात आचारिल्या जाणाऱ्या उच्च- नीचतेचा आणि त्यासंबंधीच्या दृष्ट विचारसरणीचा. अशा विशाल हृदयी भीमाच्या भविष्यातील मोठेपणाची चाहूल आंबेडकर गुरुजींना त्या काळीच लागली होती की काय कुणास ठाऊक ? त्यांनी भीमाचे 'आंबवडेकर' हे नाव बदलून 'आंबेडकर हे आपलेच आडनाव शाळेच्या दफ्तरी नोंदविले. मुळात सकपाळ आडनावाचा हो भीमा, गावाच्या नावावर आंबवडेकर झाला आणि आज त्याच्या 'आंबेडकर' या तिसऱ्या आडनावचे नामकरण झाले. एका प्रेमळ गुरुजींनी मनामध्ये कसलाही स्वार्थ न ठेवता दिलेले 'आंबेडकर' हे आडनाव व पुढे जगाच्या इतिहासात स्वर्ण अक्षरांनी कोरले गेले हे मात्र खरे ! जातीयतेचे प्रचंड स्तोम असतानाही अशा कठीण काळात समाजाची पर्वा न करता स्वतःचे आडनाव एका अस्पृश्याच्या मुलाला देणाऱ्या उदात्त अंतःकरणाच्या गुरुजींचे भीमाला भविष्यात कधीही विस्मरण झाले नाही. त्याच आंबेडकर गुरुजींनी भीमराव गोलमेज परिषदेला जाताना अभिनंदनपर पाठविलेले पत्र आयुष्याचा ठेवा म्हणून भीमाने जपून ठेवले होते. पुढील आयुष्यात मुंबईच्या दामोदर सभागृहात याच गुरुजींची भेट झाली तेव्हा डॉ. आंबेडकरांनी त्यांच्या पुढे साक्षात दंडवत घातला होता. नवा पोशाख शिवून त्यांचा गौरवही केला होतपैसे
माध्यमिक शिक्षणासाठी मुंबईकडे प्रयाण
![]() |
सातारची नोकरी संपल्याने व आपल्या मुलांनाही चांगले शिक्षण मिळावे म्हणून सुभेदारांनी आपले कुटुंब मुंबईला हलविले. मुंबईत परळ येथील डब चाळीत त्यांना जागा मिळाली. त्यामुळे तेथील मराठा हायस्कूलमध्ये भीमरावांना दाखल करण्यात आलं. पूर्वीच्या खोडकर वृत्तीच्या भीमरावांमध्ये आता बराचसा बदल घडून आला होता. आईच्या मृत्यूनंतर अभ्यासात मागे असलेले बाबासाहेब आता प्रगतिपथावर होते. शिक्षणाचे महत्त्व जाणलेल्या रामजींना मराठा हायस्कूलमधील शिक्षण फारसे भावले नाही. आपलं मूल शिकुन मोठं झालं पाहिजे, त्यामुळे त्याच्या शिक्षणाबाबत कसलीही तडजोड करायची नाही असे ठरविलेल्या रामजींनी भीमरावांना मराठा हायस्कूलमधुन काढून एल्फिस्टन हायस्कूलमध्ये दाखल केले.
येथेही त्यांच्या अस्पृश्यतेने पिच्छा सोडला नाही. मात्र इतर वातावरणामुळे त्यांच्यात अभ्यासू वृत्ती वाढीस लागली. अवांतर वाचनाची त्यांना आवड निर्माण झाली. बाबासाहेब थोडेसे हट्टी स्वभावाचे होते. ते आपल्या वडिलांकडे पैसे नसतानाही इतर अवांतर पुस्तके आणण्याचा हट्ट करीत. एकदा अशाच प्रसंगी खिशात पैसे नसल्याने त्यांच्या वडिलांनी आपल्या मुंबईत राहणाऱ्या मुलींकडून एक दागिना आणला. तो सावकाराकडे गहाण ठेवून त्याच्या पैशात बाबासाहेबांना काही पुस्तके आणून दिली. असे प्रसंग वेळोवेळी येऊ लागले परंतु सुभेदार महिन्याकाठी आपली पेन्शन आल्याबरोबर अगोदर आपल्या मुलीचा दागिना सोडवून तिला नेऊन देत असत.
आपल्या मुलाला पहाटे उठविणे, त्यांच्याकडून तर्खडकरांची भाषांतर- पाठमाला अभ्यासून घेणे, त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष देणे हा रामजींचा रोजचा दिनक्रम होता.
'वाळूचे कण रगडीता तेलही गळे' या उक्तीप्रमाणे प्रत्येक इयत्तेत बाबासाहेब उत्तमोत्तम गुणांनी उत्तीर्ण होत गेले. याचेच काय ते समाधान त्यांच्या पित्याला होते. ते जेथे राहात तेथे एकच खोली तीही धुरकट घरगुती वस्तूंनी आणि भांड्याकुंड्यांनी भरलेली होती. तिच्या एका कोपऱ्यात माळ्यावर लाकडांचा साठा होता. दुसऱ्या कोपऱ्यात चूल होती. तिथेच एक बकरी बांधलेली. त्यामुळे अभ्यासासाठी स्वतंत्र खोली वगैरे या साऱ्या बाबींचा तर स्वप्नातसुद्धा विचार करण्यासारखी परिस्थिती नव्हती. मिणमिणत्या तेलाच्या दिव्यावर ते रात्र-रात्र अभ्यास करीत असत.
भीमरावांची शैक्षणिक प्रगती पाहून आपली आर्थिक परिस्थिती लक्षात घेता रामजींनी भीमरावांना शिकविण्यासाठी आपला दुसरा मुलगा आनंद याचे शिक्षण थांबवून त्याला नोकरीस लावले.
स्वतः भीमरावांनीही आपली आर्थिक परिस्थिती लक्षात घेता काही बारीक- सारीक कामे, प्रसंगी हमालीही केली. स्वावलंबी असणाऱ्या भीमरावांना क्रिकेटचीही आवड होती. ते उत्तम क्रिकेट खेळत असत.
शाळा, वाचन, खेळ यासाठी भीमरावांना दिवस व रात्र अपुरी पडायला लागली. १९०७ हे वर्ष उजाडलं. त्या वर्षी भीमराव मॅट्रिकला होते. त्या काळी मॅट्रिकच्या वर्षाला फारच महत्त्व होतं. मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण होण हे भूषाणावह समजलं जायचं. विद्यार्थी, पालक व शिक्षक हे सारे चिंतेत राहायचे परंतु याला अपवाद होते भीमराव ! कारण भीमरावांच्या चेहऱ्यावर मॅट्रीक उत्तीर्ण होण्याबाबत कसलीही चिंता दिसत नव्हती. विजयाचा गुलाल निकालापूर्वीच लागावा एवढा प्रचंड आत्मविश्वास त्यांच्या चेहऱ्यावर होता. याची प्रचीतीही लवकरच आली. भीमराव मॅट्रिकच्या परीक्षेस पहिल्या प्रयत्नातच उत्तीर्ण झाले. या गोष्टीमुळे रामजीच्या आनंदाला सीमा उरल्या नाहीत. ही परीक्षा भीमराव नाही तर रामजींच उत्तीर्ण झाले आहेत, अशीच एकंदरीत परिस्थिती होती.
जीवनातील पहिलं यश पहिला सत्कार
'बुद्धीच्या कॅमेऱ्यात विचाराचा रोल बसवून प्रयत्नाचं बटण दाबलं असता यशाचा किनारा दूर राहात नाही.' या उक्तीप्रमाणे भीमरावांची पराकाष्ठा कामी आली. इ. स. १९०७ साली ७५० पैकी २८२ गुण घेऊन ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांच्या जीवनातील यशाचा एक टप्पा त्यांनी पूर्ण केला. रामजींचा आनंद गगनात मावेनासा झाला. सर्व कुटुंब आनंदी झाले. भीमरावांच्या रूपाने • अस्पृश्य समाजातील पहिला विद्यार्थी मॅट्रिक पास झाला होता. त्या काळी एका महाराचे पोर मॅट्रिक पास होणं हेच सर्वांसाठी आश्चर्याची बाब होती. या अलौकीक यशाबद्दल काही धुरिणांनी त्यांच्या सत्काराचं आयोजन केलं. या समारंभास दलितांचे कैवारी लोकहितवादी सीताराम केशव बोले हे। अध्यक्षस्थानी होते. दलित वर्गाची कड घेणारे कृष्णाजी केसकर हेही समारंभास उपस्थित होते. केळुसकर गुरुजी हे स्वतः लेखक असून समाज सुधारकही होते. या समारंभात गुरुवर्य । गुरुवर्य कृष्णाजी केळुसकर केळुसकरांनी जणू भविष्याची चाहूल लागली होती की काय ? त्यामुळेच भीमरावांच्या सत्कारात स्वतः लिहिलेले बुद्धचरित्र त्यांनी भेट म्हणून दिले. ते चरित्र भीमरावांच्या आयुष्याच्या शेवटच्या पर्वात दीपस्तंभ ठरले. या समारंभात ● भीमरावांचे त्यांनी खूप कौतुक झाले. पुढे शिकविण्यासाठी उत्तेजनही दिले. हा सत्कार होता मानवतेचा, हा सत्कार होता पुरोगामी विचारांचा, हा सत्कार होता उज्ज्वल भारताच्या भवितव्याचा. या सत्कारामुळे भीमरावांचे मनोबल वाढले आणि त्यांनी पुन्हा कधीही मागे वळून पाहिले नाही. त्यामुळे भीमरावांच्या जीवनातील हा पहिला सत्कार विशेष महत्त्वाचा ठरतो.
आंबेडकरांची तीन स्फुर्तिस्थाने
(भगवान बुद्ध, संत कबीर आणि महात्मा फुले) भीमराव आंबेडकर यांच्या जडणघडणीत गौतम बुद्ध, संत कबीर आणि महात्मा फुले यांना विशेष महत्त्व होते. केळुसकर गुरुजींनी भीमरावांना भगवान गौतम बुद्धांचे चरित्र भेट दिले होते. तेव्हापासून गौतम बुद्ध हे भीमरावांचे आदर्श होते. पुढे १९५६ साली भीमरावांनी विचारपूर्वक धर्मांतर केले आणि बुद्ध धर्माचा स्वीकार केला.
![]() |
तथागत गौतम बुद्ध, संत कबीर , महात्मा ज्योतिबा फुले |
भीमरावांचे वडील रामजी हे स्वतः कबीर पंथी होते. त्यामुळे कबीरांच्या विचारसरणीचा वारसा त्यांना वडिलांकडूनच मिळाला होता. कबीरांचे दोहे भीमरावांना पाठ होते. त्यातील तत्त्वज्ञान त्यांनी अनुसरले होते. साधुत्वाबद्दल कबीर एके ठिकाणी म्हणतात,
"मनुष्य होना कठिन है। तो साधु क्या बने ?"
(चांगला माणूस होणे अत्यंत कठीण आहे. जो चांगला माणूस होऊ शकत नाही, तो साधू कसा बरं होऊ शकेल ?)
भीमरावांच्या मनावर याच विचारांचा प्रभाव होता. 'शिक्षणाच्या मार्गानेच वंचितांचा विकास होईल हे महात्मा ज्योतीराव फुले यांचा विचार डॉ. भीमरावांनी आत्मसात केले होते.'
या तीन महामानवांचा भीमरावांच्या जडणघडणीत मोलाचा वाटा होता.
रमाबाईंशी विवाह
भीमराव मॅट्रिकची परीक्षा नुकतेच उत्तीर्ण झाले होते. घरात आनंदी वातावरण होते. वर्ष होते १९०७. भीमराव आता सोळा वर्षांचे झाले होते. त्या काळी मुला- मुर्तीचे विवाह बालवयातच होत असत. त्यामुळे वडील रामजींनी भीमरावांसाठी मुली शोधण्याचे काम सुरू केले. आपला मुलगा भीम हा अत्यंत हुशार, गोरा, सदृढ बांध्याचा असल्याने त्याच्यासाठी मुलगीही सुंदर, देखणी असावी असा रामजींचा अट्टाहास होता. एके दिवशी रामजी मासोळी बाजारात गेले असता त्यांची गोविंदपूरकर नावाच्या सद्गृहस्थाची भेट झाली. त्यांच्यासोबत अत्यंत गोंडस अशी नऊ वर्षांची मुलगी होती. ती म्हणजे भागीरथी ऊर्फ रमाबाई. ही गोविदपूरकरांची भाची अन् कोकणातल्या वणंदगावच्या भिकू धुत्रे यांची ती मुलगी. रामजींना रमाबाई सून म्हणून आवडली. यापूर्वी पाहिलेली दोन स्थळे सोडून भीमरावांचा आणि रमाबाईंचा विवाह भायखळ्याच्या मासोळी बाजारात संपन्न झाला.
![]() |
| Dr.BabasahebAmbedkar & ramabai Ambedkar |
आई-वडिलांच्या अकाली जाण्याने लहानपणीच अनाथ झालेल्या रमाबाई ही स्वभावाने शांत असून धार्मिक वृत्तीची होती. याच काळात दलित समाजाच्या उद्धाराची चळवळ गती घेऊ लागली होती. काही समाज सुधारकांनी समाजसुधारणेचे कार्य हाती घेतले होते. आंबेडकरांचाही अस्पृश्यते विरोधात संघर्ष सुरू होता. त्यामुळे आपल्या पतीवर काही संकट येऊ नये यासाठी सुरुवातीचा संसार दारिद्र्यात काढणारी रमाबाई भीमरावांच्या रक्षणासाठी व्रत-वैकल्ये, उपास- तापास, प्रार्थना, नवस इत्यादी गोष्टी सातत्याने करीत असे. तिला अनेक मुले झाली पण 'यशवंत' हा एकमेव मुलगा जगला.
FQA
- What is the big information of Dr Babasaheb Ambedkar ?
- What is the caste in India Bhimrao Ramji Ambedkar ?
- Who is the father of Constitution ?
- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना किती मुले होती ?
- डॉक्टर बाबासाहेब यांचा जन्म कुठे झाला?
- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुसऱ्या बायकोचे नाव काय?
- रमाबाई आंबेडकर यांच्या आईचे नाव काय?
- बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांचे नाव काय होते?
- बी.आर.आंबेडकरांची राज्यघटना बनवण्यात काय भूमिका होती?








